पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची जुनी वसाहत म्हणजे रात्रीस खेळ चाले.

             पुरंदर रिपोर्टर लाईव्ह 

लोणंद : प्रतिनिधी

                            नीरा लोणंद महामार्ग वरील नीरा नदीकाठील शेजारी समता आश्रम शाळा, पाडेगाव यांच्या पाठीमागील बाजूस ऊस संशोधन केंद्राची जुनी वसाहत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या वसाहतीत कोणीही राहत नसल्याने इमारती मोडकळीस आल्या आहेत, याचाच फायदा चोरट्यांनी, दारुड्यांनी आणि जुगार खेळणाऱ्यांनी घेतल्याचे समोर आले आहे.



ग्रामस्थांच्या माहितीनुसार, या वसाहतीतील काही खोल्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटर व मोटरच्या केबल चोरी करून आणल्या जातात. त्यानंतर केबल जाळून त्यातील तांबे काढून विक्री केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक खोल्यांमध्ये केबलचा खच साचून राहिला आहे, याच ठिकाणी केबल जाळलेल्या राखेचे मोठे ढिगारे देखील दिसत आहेत.  कायम रहदारीचा असलेल्या रोड नजीक होत असलेल्या या प्रकाराबद्दल पोलिस प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलीही दखल घेतली जात नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




अलीकडेच या वसाहतीतून चोरीची मोटरसायकल उघडून त्यातील पार्ट काढण्याचा प्रयत्न झाल्याचेही उघड झाले आहे. याठिकाणी ऊस संशोधन केंद्राचे अधिकारी राहत नसल्यामुळे कोणीही देखरेख करत नाही. झाडाझुडपांनी व्यापलेल्या या वसाहतीत रात्रीच्या वेळी दारुड्यांची व जुगाऱ्यांची गर्दी दिसते. ‘रात्रीस खेळ चाले’ अशीच परिस्थिती येथे निर्माण झाली असून, तीन पत्ती जुगारही मोठ्या प्रमाणात खेळला जात असल्याची चर्चा तसेच रात्री च्या अंधारात काही घृणास्पद प्रकार देखील येथे घडत असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.


शेतकऱ्यांच्या केबल चोरी होऊन नीरा-लोणंद रोडच्या अगदी जवळ केबल जाळण्याचा धंदा उघड्यावर सुरू आहे, हे पाहून ग्रामस्थही आश्चर्यचकित झाले आहेत. या चोरीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, “या बेकायदेशीर कृत्यांना वेळीच आळा घालावा, व चोरीचा माल घेणारा खरा सूत्रधार शोधून काढावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा”, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments